पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Ajit Pawar) यांनी आज बारामती लोकसभा (Baramati Lokasabha) मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदासंघाचा दौरा केला. पार्थ यांनी दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत आलेल्या नेत्यांच्या भेठीगाठी घेत मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा देखील घेतला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये 40 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकायच्याच असा निर्धार सत्ताधारी भाजपने केला आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपसोबत युतीत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार दिला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांनी बारामतीच्या विकासावरून जेष्ठ नेते शरद पवार यांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही पवारांमध्ये सुरू असणारा संघर्ष येत्या काही दिवसांत आणखीन तीव्र होताना दिसू शकतो.
बारामती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार हा पवार कुटुंबातील असेल का? असाही प्रश्न कायम उपस्थित केला जातो. त्यामुळेच पार्थ पवार यांनी आज केलेल्या खडकवासला दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात दौरा करत पार्थ यांनी जुन्या – नव्या नेत्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला.