पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप, महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला असून राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक खासदारांना निवडून दिले आहे. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याची टीका अनेकांनी केली आहे. त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकातून टीका करण्यात आली आहे.
‘लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असून अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपने स्वतःची किंमत केली’, अशा टीका संघाच्या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आषाढी एकादशी संदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
“मला यासंदर्भात काहीही बोलायचे नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा किंवा भूमिका स्पष्ट करायचा पूर्ण अधिकार आहे. मला फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे. महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार मी करतो आहे. त्यानुसार येणाऱ्या विधानसभेत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पावसाळ्यात दूध पित आहात? होऊ शकते नुकसान, वाचा काय परिणाम होतात?
-सुषमा अंधारे यांनी दिलेल्या ऑफरवर रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘त्या माझ्या मैत्रीण…’
-जगताप दीर भावजईच्या वादात भाजपच्या निष्ठावंताने घेतली उडी; केला ‘हा’ गंभीर आरोप
-खासदार निलेश लंकेंची कुख्यात गँगस्टरसोबत भेट, राजकीय वर्तुळात खळबळ