पुणे : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार तानाजी सावंत ह सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सोमवारी त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाल्याच्या बातमी पसरली अन् सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अवघ्या काही तासांतच शोधून काढले. प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हा मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले होते. मुलाचे अपहरण झाल्याचे तानाजी सावंत यांनी पोलीस प्रशासनाला का सांगितले? असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी (जुलै २०१९मध्ये) कोकणातील तिवरे धरण फुटले अन् तात्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी त्याच धरणात मृत्यू झालेल्या खेकड्यांना धरणफुटीसाठी जबाबदार ठरवलं होतं. त्यानंतर बनावट औषधांचा पुरवठा प्रकरणातही तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तानाजी सावंत यांच्या राजकीय कारकिर्दीतील वादग्रस्त आणि सर्वाधिक चर्चेत असलेली प्रकरणे नेमकी कोणती? ती पाहूयात…
खेकड्यांनी धरण फोडले?
2 जुलै 2019 रोजी कोकणातील तिवरे धरण फुटले आणि यामध्ये 19 जणांचे प्राण गेले होते. या धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचं वक्तव्य तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यावेळी सावंत यांनी केलेल्या या हास्यास्पद दाव्याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. या प्रकरणावरुन तानाजी सावंतांवर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती.
बनावट औषध पुरवठा
डिसेंबर २०२४मध्ये बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानेच बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले. हा सर्व बनावट पुरवठा करण्यात आलेली औषधे हरिद्वारच्या जनावरांची औषधी कारखान्यात तयार केल्याचे समोर आले. उत्तर प्रदेशातून या गोळ्या महाराष्ट्रात पाठवण्याचे रॅकेट सक्रीय असल्याचे चौकशीत समोर आले होते. याप्रकरणी तात्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी विरोधक तसेच सामान्य जनतेकडूनही करण्यात आली होती. मात्र, माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं तानाजी सावंत म्हणाले होते. त्यावरुनही त्यांच्यावर टीका करण्यात आल्या होत्या.
मुलाचे अपहरण?
ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन प्रायव्हेट चार्टर्ड प्लेनने बँकॉकला गेला होता. मात्र, त्याचे अपहरण झाल्याची माहिती पसरताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अंदमान-निकोबारपर्यंत गेलेले ऋषिराज सावंत यांचे विमान माघारी वळवण्यात आले. हे चार्टर्ड प्लेन रात्री साडे दहाच्या सुमारास लोहगाव विमानतळावर उतरले. त्यानंतर पुणे पोलिसांनी विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब नोंदवून घेतला. यामध्ये ऋषिराजचे अपहरण झाले नसून तो त्याच्या मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता, असे चौकशीतून समोर आले आहे.
ऋषिराज सावंत बँकॉकला रवाना झाल्यानंतर पुणे पोलिसांना त्यांचे अपहरण झाल्याचा निनावी फोन आल्याचे सांगितले. त्यानंतर तानाजी सावंत आपल्या मोठ्या मुलासह पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. नेमक्या कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
दरम्यान, तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री असताना तिवरे धरण फुटणे, आरोग्यमंत्री असताना बनावट औषधांचा पुरवठा आणि आता आमदार सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या वावड्या या संपूर्ण प्रकरणांमध्ये तानाजी सावंत यांच्याकडे शंकेने पाहिले जात आहे. तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाच्या अपहरणाची बातमी तक्रार देत या प्रकरणाला वेगळे वळण का दिले असावे, की खरंच त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचा फोन तानाजी सावंत यांना आला होता? याबाबत अद्यापही शंका आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Traffic: दारु पिऊन गाडी चालवणं तरुणाला पडलं महागात; ५ दिवस जेल अन्…
-पुणे विमानतळावर ‘डिजियात्रे’चा मोहोळांकडून शुभारंभ; मात्र इतर ३३ विमानतळांबाबत दिली ‘ही’ कबुली
-Pune: महापालिका निवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्वाची माहिती
-“दादा बोलले असतील तर फायनल…”, पालिका निवडणुकीबाबत सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य
-Delhi Vidhansabha: “…तर भाजपच्या २० जागा आल्या नसत्या”, शरद पवारांच्या आमदाराचं मोठं वक्तव्य