पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारण्यासाठी जागा निश्चितीचा बहुप्रतिक्षीत निर्णय अखेर झाला. जाधववाडी-चिखली येथील गट. नं. ५३९ मधील ३ हे. ३९ आर. शासकीय जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थान आणि परेड ग्राऊंड प्रयोजनाकरिता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनसाठी जागा व दापोडी पोलीस स्टेशनची निर्मिती याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संबंधित विषय मार्गी लावण्याबाबत आग्रही मागणी केली होती.
‘पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीचा लढा आपण यशस्वी केला. दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. पण, आयुक्तालयासाठी स्वतंत्र- हक्काची इमारत नव्हती. त्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागांकडून सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले’, असे महेश लांडगे म्हणाले आहेत.
भोसरी विधानसभा मतदार संघातील जाधववाडी, चिखली येथील गट नंबर ५३९ पै. मधील ३ हे.३९ आर. जागेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची भव्य वास्तू उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. याठिकाणी पोलीस अधिकारी निवासस्थान व परेड ग्राऊंड होणार आहे. तसेच, चिखली पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी ९ गुंठे जागा निश्चित केली आहे. त्यामुळे आयुक्तालय, चिखली पोलीस स्टेशनच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले.
पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे सदर शासकीय जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करील. तसेच, जमिनीचा ताबा मिळाल्यापासून ३ वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक राहील, अशा अटींवर या जागेला मान्यता देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, तरीही भाजपात निरुत्साहच? नेमकं कारण काय?
-महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा; डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतला
-Zika Virus: पुण्यात झिकाचा धोका वाढला; आणखी २ गर्भवती महिलांना संसर्ग