पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र नुकतंच शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये अजितदादांनी त्यांची भेट घेतल्याने दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे या चर्चेला आणखीनचं बळ मिळताना दिसत आहे. तुपे यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर “दोन्ही पवार एकमेकांना भेटत आहेत, वाढदिवसाला शुभेच्छा देत आहेत, त्यामुळे जर महाराष्ट्राची इच्छा असेल त्याप्रमाणे ते करतील” असं सांगितलं आहे.
शरद पवारांचे निवासस्थान असणाऱ्या मोदी बागेत अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना “आपण रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग प्रमुख असून संस्थेच्या कामानिमित्त आज साहेबांची भेट घेतली. नवीन वर्षात रयत शिक्षण संस्थेने काही उपक्रम राबवायचे ठरवले असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी साहेबांनी आज वेळ दिली होती. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध देखील असल्याने आजच्या भेटीला राजकारणाशी जोडू नये. राजकारण हे केवळ एक महिन्यापुरतं असतं त्यानंतर विकासाचे काम करायचं असतं” असेही चेतन तुपे म्हणाले.
पवार काका – पुतणे पुन्हा एकत्र येणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजप महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ यश मिळवल आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला मात्र विशेष कामगिरी करता आली नाही. दरम्यान राजकारणामध्ये निर्माण झालेला दुरावा संपवत दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. काही दिवसांपुर्वी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवारांनी त्यांच्या घरी जात भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटांच्यावर चर्चा झाली होती.