पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात महामानवाला वंदन केले जात आहे. पुणे स्टेशन येथे असणाऱ्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना बाबासाहेबांनी सर्वांना दिलेले विचार आणि शिकवण ही समाजाचे हित जपण्यासाठी कायम प्रेरणा देते, त्यांच्या विचारावर आज देश चालत असल्याचं मोहोळ म्हणाले.
दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपकडून राज्यघटना बदलण्याचे काम सुरू असल्याचे टीका केली होती. सुळे यांच्या टीकेचा देखील मुरलीधर मोहोळ यांनी समाचार घेतला. “संविधान बदलण्याची विरोधकांची टीका ही धादांत खोटी असून ते केवळ खोटं बोलण्याचा काम करत आहेत. बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारने केलं. इंदू मिल स्मारक असो की लंडनमधील घर हे आमच्या सरकारने केलं आहे. विरोधकांनी राजकारण सरळ करावं, खोटं बोलून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये” अशी टीका मोहोळ यांनी केलीय.
बोलायला गेलो तर खूप काही निघेल, आम्ही कोणावरही व्यक्तिगत बोलत नाही. या देशातील जनता विकासाला पाठींबा देणारी असून कोणत्याही भावनिक आणि खोट्या प्रचाराला मत देत नाही. गेल्या दहा वर्षात केलेलं विकासाचे काम जागतिक स्तरावर भारताला महासत्ता बनवण्याचे काम मोदी सरकारने केल. त्यामुळे देशातील जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठरवल असल्याचेही मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-आधी अश्रू अनावर अन् आज थेट जोडले हात; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांचं मौन कायम
-“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार”; अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा