भोर विधानसभा : १९९९ साली राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली. तेंव्हा सत्तेवर असणारे भाजप–शिवसेना युतीचे सरकार पडणार हे निश्चित मानल जात होतं. विरोधात असणाऱ्या काँग्रेसला सत्तेवर येण्याची संधी निर्माण झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असणारे अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. निवडणूक झाली आणि काँग्रेस पक्ष विरोधात लढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्तेवर देखील आला. पण मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या अनंतराव थोपटेंचा इथे खरा गेम झाला. कारण भोर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी थोपटेंच्या विरोधात रान उठवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथराव खुटवड यांना निवडून आणले. १९९९चा हा पराभव अनंतराव थोपटे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि तेव्हापासून पवारांसोबत राजकीय वैर सुरु झाले.
आता २० वर्षानंतर आपल्याच पुतण्याने बंड केल्याने बारामती लोकसभेत लेकीच्या विजयासाठी शरद पवार थेट थोपटे यांच्या घरी पोहचले. जुन्या कडू-गोड आठवणींना उजाळा देत झालं-गेलं विसरून अनंतराव थोपटे आणि शरद पवार एकत्र आले. लोकसभा निवडणुकीत भोर मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी चांगलीच मेहनत घेतली. जवळपास ४३ हजारांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळाले आणि सुळेंचा विजयी सुकर झाला. या सगळ्या इतिहासाची जोड आता होऊ घातलेली विधानसभा निवडणुकीलाही आहे.
गेल्या ४ दशकांपासून थोपटे पिता-पुत्रांनी आपला बालेकिल्ला बनवलेला भोर मतदारसंघ काबीज करत बारामतीच्या पराभवाचा वचपा अजित पवारांना काढायचा आहे. तर थोपटेंचा ‘संग्राम’ रोखण्यासाठी एक ‘मुळशी पॅटर्न’ देखील येथे सक्रीय झाला आहे. त्यामुळे खरंच थोपटे यांचा पराभव होईल का? अजित पवारांना बारामतीच्या पराभवाचा बदला घेता येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोपटेंचा बालेकिल्ला भोर मतदारसंघ
भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्याचा भाग मिळून हा भोर मतदारसंघ तयार झाला आहे. बऱ्यापैकी ग्रामीण, दुर्गम, डोंगर दऱ्यांतील वस्ती, ७ मोठी धरणे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि जंगल क्षेत्राची मोठी व्याप्ती असणारा हा मतदारंसघ आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी मतदारसंघाचे ६ वेळा नेतृत्व केले आहे. तर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे सध्या भोरचे आमदार आहेत. काँग्रेसच्या या बालेकिल्यात ‘यंदा आपल्याच भागातला आमदार हवा’, हा नारा मुळशीकरांमध्ये चर्चिला जातो आहे. शिवसेनेला आजवर भोर मतदारसंघात ३ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ९० हजार मतांच्या जोरावर अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा केला जाणार हे निश्चित मानले जात आहे.
महायुतीकडून भोर विधानसभेसाठी कोण इच्छुक?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार काशीनाथराव खुटवड यांचे पुत्र विक्रम खुटवड, स्थानिक स्वराज्य संस्थेत थोपटे यांना पराभूत करणारे रणजीत शिवतारे, पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे हे लढण्याची तयारी करता आहेत. तर भाजपमधून माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नावाचा जोर पहायला मिळतो आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले आणि थोपटेंचे पारंपारिक विरोधक असणारे कुलदीप कोंडे हे देखील शिवसेनेकडून लढण्यासाठी आग्रही आहेत.
काही दिवसांपूर्वीच वेल्ह्याचे नामकरण ‘राजगड’ तालुका करण्याचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आला. या माध्यमातून येथील जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न आहे. गेली अनेक वर्षे आमदार असताना देखील आजही अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येथे कायम आहे. यासोबतच ऊसाची थकीत बिले, रखडलेला गुंजवणीचा प्रस्ताव, शहरी पट्ट्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे संग्राम थोपटे अडचणीत येऊ शकतात. एकंदरीत भोर मतदारसंघातील आजचे राजकीय चित्र पाहता संग्राम थोपटे पुन्हा आमदार होतील का? कि दुसऱ्या चेहऱ्याला संधी मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवत मिळवली नोकरी; बच्चू कडूंच्या अभियाने फुटणार बिंग
-स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध