पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येत असून, रिक्षा चालकांकडून रिक्षा हुडवर छावलेल्या बॅनरमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली महेश लांडगे यांचे नाव छापलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहरातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता आमदार महेश लांडगे यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी काही रिक्षाचालक व लांडगे यांच्या समर्थकांनी रिक्षांवर हुड फलक लावले आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली आमदार महेश लांडगे यांच्या नावाचा फाऊंट छापण्यात आला आहे. सदर रिक्षा हुडवरील फलकांमुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाद्वारे पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले “राजकीय उद्देशाने काही व्यक्ती संबंधित रिक्षांवरील हुड बॅनरबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सबंधित रिक्षांवरील जनजागृतीचे हुड काढावेत, असे आवाहन रिक्षाचालक व सहकारी-हितचिंतकांना करीत आहे”.
दरम्यान, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय समाजकंटक जातीय धार्मिक तसेच भावनिक तेढ निर्माण करून आपला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत असतात. असाच काहीसा प्रकार काल माझ्या कानावर आला. विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संविधानाच्या विचारांनी समृद्ध असलेले देशातील सर्वात पहिले भव्य असे संविधान भवन आपण आपल्या शहरात उभारत आहोत, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, लवकरच या संविधान भवनाचे कामही सुरू होणार आहे.. याबाबतीत माहिती देणारे रिक्षा हुड एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर बसवले.. त्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या खालच्या भागात अनावधानाने व नजरचुकीने माझे नाव छापले गेले होते.. यामध्ये कुणाचीही भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता, असेही महेश लांडगे म्हणाले.