भोसरी: शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असणारी लढाई दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एका बाजूला महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातून उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यामध्ये काटे की टक्कर सुरू आहे. आढळराव पाटील यांच्यासाठी भाजपची यंत्रणा देखील कामाला लागली आहे. आढळराव पाटील यांना एक लाखांचे मताधिक्य देण्याची भीष्मप्रतिज्ञा करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आता व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी महेश लांडगे यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. “भोसरी विधानसभेतून १ लाख मातांची आघाडी राहील अन् शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल”, असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
“देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात झालेला विकास, शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, कल्याणकारी योजना आणि देशाची जागतिक पातळीवर उंचावलेली प्रतिक्षा यामुळे महायुतीला निश्चितपणे मोठा जनाधार आहे. भोसरी मतदार संघातील सुमारे ५ लाख ३५ हजाराहून अधिक असलेले मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देतील, असा विश्वासही महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी गावठाण येथे दौरा करण्यात आला. यावेळी पदयात्रेची सुरूवात भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर श्री हनुमान मंदिर येथे भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत आढळराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, भोसरी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसरात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.