पुणे : राजकारणामध्ये भाजप कोणता डाव कधी खेळेल हे, सांगणे आता राजकीय चाणक्यांना देखील अवघड जात आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने मोठा डाव खेळला, तर दुसरीकडे पुण्यामध्ये गुंतलेला राजकीय तिढा देखील मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने सोडवला गेल्याचं बोलले जात आहे. कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपाने लोकसभेचे गणित देखील सोपे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यामधील सख्य काही लपून राहिलेले नाही, मात्र कुलकर्णी यांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे मोहोळांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोलले जात आहे.
कुलकर्णींमुळे मोहोळांचा मार्ग कसा सोपा झाला?
वर्षभरापूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. या पराभवाला ब्राह्मण समाज नाराज असल्याची देखील एक किनार होती. त्यामुळे आता कोणत्याही निवडणुकीला ब्राह्मण समाजाला गृहीत धरणे भाजपसाठी अवघड बनल्याचं दिसून आलं. यामध्ये भर म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून कोथरूडच्या आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना सतत डावलले जात असल्याचा आरोप केला जात. त्यामुळे आता लोकसभेला तरी त्यांच्या रूपाने भाजप ब्राह्मण उमेदवार देईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता चर्चा आहे ती लोकसभेला संधी कोणाला?
सुरुवातीपासून लोकसभेच्या रेस मध्ये माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर आहे. तर वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वीच पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळीक यांना आपल्या वडगावशेरी मतदारसंघात लक्ष देण्याचा सल्ला जाहीर स्टेजवर दिला होता. दुसरीकडे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी देखील मैदानात दंड थोपटले होते. मात्र राज्यसभेवर ब्राह्मण चेहरा पाठवत भाजपने देवधर यांची देखील विकेट काढल्याची चर्चा आहे.
मुळीकांना मतदारसंघात लक्ष देण्याचा सल्ला तर देवधरांचा मार्ग बिकट
जगदीश मुळीक यांना प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा मतदारसंघात लक्ष देण्याचा दिलेला सल्ला तसेच काल मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत ब्राह्मण समाजाला दिलेले प्रतिनिधित्व. यामुळे आता संपूर्ण पुणे शहरात ओळखीचा चेहरा असणारे आणि महापौर असताना कोरोना काळामध्ये केलेल्या कार्यामुळे पुणेकरांच्या घराघरात पोहचलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामती मतदारसंघातून महत्वाची अपडेट; सुनेत्रा पवार कांचन कुल यांच्या भेटीला
-रक्षकच बनले भक्षक; गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी उकळले पैसे
-भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि दबावतंत्र; रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप
-स्वयंघोषित स्टंटाबाजाचा व्हिडीओ व्हायरल; वाहतूक पोलिसांकडून शोध सुरु