पुणे : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि तारखाही जाहीर झाल्या मात्र अद्यापही काही जागांवर महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला नाही. राज्यातील मावळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही.
मावळ लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे नकोच अशी ताठर भूमिका मावळ तालुका भाजपने घेत तिथे माजी मंत्री बाळा भेगडे यांना तिकीट देण्याची जोरदार मागणी शनिवारी केली होती. बारणेंना तिकीट दिले, तर नोटाचे बटण दाबू, पण त्यांचे काम करणार नाही, असा बंडाचा पवित्रा त्यावेळी मावळ `भाजयुमो`ने घेतला होता. मात्र, हे बंड काही तासात शमलं नाही, तर शमविलं गेलं. त्यामुळे ते पेल्यातील वादळ ठरलं आहे.
महायुतीमध्ये शिरुरप्रमाणे मावळ लोकसभेच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु होती. भाजपनेही या जागेसाठी चांगलाच आग्रह धरला होता. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या. बारणेंविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या बाळा भेगडे यांच्या उमेदवारीची मागणी केली होती.
मावळमध्ये निवडून येईल असा बारणेंशिवाय दुसरा पर्याय महायुतीकडे नाही. दुसरीकडे केंद्रातील सत्तेची आणि मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपला एकेक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे पर्याय नसल्याने त्यांनी मावळात बारणेंना खासदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आपल्यालाच मिळण्याची खात्री असल्याने श्रीरंग बारणेंनी आपली उमेदवारी आधीच जाहीर केली.
मावळात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव निश्चित झाल्याने मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दिसणार आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून मावळमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्याच नावाची घोषणा होणार आहे. मावळमधून राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके आणि मावळ भाजपने केलेला दावा आता भाजप, राष्ट्रवादीला मागे घ्यावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘हे’ असणार काँग्रेस उमेदवार; चंद्रकांत पाटलांनी थेट नावच सांगितलं
-‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य
-“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान