पुणे : विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहराचे वारंवार होणाऱ्या गुन्हेगारीमुळे तसेच ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच शहरामध्ये अमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. शहरातील छोट्या मोठ्या हॉटेल्स, बार मध्ये खुलेआम अमली पदार्थ मिळतात, मात्र केवळ गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘शंभूराज देसाई युवा पिढीचे कसाई’ अशा आशयाचे पोस्टर आंदोलनामध्ये शरद पवार गटाकडून झळकवण्यात आले आहेत.
कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून भर दिवसा हातात कोयता घेऊन हिंडणारे गुंड अनेक ठिकाणी दिसत आहेत. कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही. ड्रग्स माफियांना, गुन्हेगारांना अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे अभय आहे ही बाब सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी मात्र केवळ लोकसभा निवडणुकीच्या चिंतनात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि विधानसभेच्या जागा वाटपात व्यस्त आहेत.
अशा स्वार्थी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी व महाराष्ट्रातील अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजी नगर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी “पालकमंत्री उत्तर द्या, गृहमंत्री उत्तर द्या, 50 खोके एकदम ओके, 50 खोके कोयता गँग ओके, 50 खोके ड्रग माफिया ओके, गृहमंत्री राजीनामा द्या, उत्पादन शुल्क मंत्री राजीनामा द्या, मोदींसाठी मुरलीधर पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर” अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमला होता. सरकारकडून येत्या काही दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास शहरात एकच वेळी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या प्रयत्नानंतर पुणे विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी
-Pune Drugs Party: शहरातील पब्जवर जिल्हाधिकाऱ्यांची असणार करडी नजर
-‘हे घरात यायची वाट पाहणार का?’ पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन पिट्याभाईची आणखी एक आक्रमक पोस्ट
-अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ
-पुणे ड्रग्जच्या विळख्यात; ड्रग्ज सेवन करणाऱ्या २ तरुणींचा व्हिडिओ व्हायरल