पुणे : लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. अनेक पक्षांनी आपापला उमेदवार जाहीर केला आहे. काही पक्षांमध्ये अद्यापही जागावाटपाबाबत प्रश्न सुटला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने आपला उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संजोग वाघेरे यांनी आपला प्रचारही सुरु केला आहे. मात्र संजोग वाघेरे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव या मतदारसंघासाठी चर्चेत आहे. शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांकडून देखील ‘श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी मिळणार आणि तेच खासदार असणार’ असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे. बारणेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजही या जागेवर दावा केला आहे.
मावळच्या या जागेवरुन स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या तिढ्याचे पडसाद आता वरिष्ठ पातळीवरही उमटायला सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या या रस्सीखेचचे परिणाम या लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसण्याची शक्यता आहे. महायुतीपुढे हा मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुती चर्चेअंती कोणाची उमेदवारी जाहीर करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरेंच्या विरोधात मनसे उभी ठाकली; कात्रजमधील पोस्टरची चर्चा
-लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यांची बदली; आता ‘हे’ असणार नवे पालिका आयुक्त
-‘तानाजी सावंत भावी मुख्यमंत्री’; पुण्यातील पोस्टरची सर्वत्र चर्चा
-‘अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक’; सुप्रिया सुळेंनी दादांना धरलं धारेवर