पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसंदर्भात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यातील मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. पुण्यातील काही नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याही नावाची चर्चा होती. यावरुन आता शेळकेंनी भाष्य केले आहे.
‘माझ्यावर कोणत्याही मंत्री पदाची जबाबदारी सोपवली तर मी जनतेला न्याय मिळवून देईन’, असं अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. घटनेने दिलेल्या प्रत्येक पदासाठी काम करावं लागतं. उद्या जरी मला आदीवासी विभाग दिला तरी मी त्यांच्यासाठी जोमाने काम करेन. तळागाळातील नागरिकांना योजना मिळाल्या पाहिजेत त्यांना न्याय देता आला पाहिजे. प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं’, असंही सुनील शेळके म्हणाले आहेत.
‘महायुतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आहे, ते आम्हाला सर्वांना मान्य करावा लागणार आहे. त्यांचं संख्याबळ देखील मोठं आहे. त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाचं संख्याबळ आहे आणि त्यानंतर आता आमच्या राष्ट्रवादीचं संख्याबळ आहे. महायुतीमध्ये आमच्या पक्षाला किती मंत्रिपदं किंवा कोणती पदे मिळणार आहेत. त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. पक्षात श्रेष्ठ नेते आहेत. प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याचं काम अजित पवार सातत्याने करत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात किती मंत्रीपद मिळतील आणि आम्हाला राष्ट्रवादीला किती खाती मिळतील ते देखील अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, वरिष्ठ नेत्यांनी कोणतं पद दिलं तर मी ती जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडेन, पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेन’ असे सुनील शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या विजयी आमदारांची चंद्रकांत पाटलांनी घेतली सदिच्छा भेट
-‘गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह’; डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण
-राज्यात ‘या’ दिवशी होणार सत्तास्थापन! महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!
-एकनाथ शिंदे मन मोठं करून भाजपला मुख्यमंत्रिपद देतील; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य