पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळपासून राज्यभरातील विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार आघाडीवर आणि पिछाडीवर आहेत याबाबतचे कल समोर येत आहेत. आता सहाव्या फेरीची मतमोजणी होत असून अनेक जागांवर उमेदवारांनी आपली आघाडी पहिल्या फेरीपासून कायम ठेवली आहे.
पुण्यातील कोथरुडचे भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या फेरीपासून सलग सहाव्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला राज्यात २८८ पैकी १६० जागा मिळतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
“कोथरूडमध्ये फक्त लीड किती आहे ते मोजायचं आहे. राज्यात १६० पेक्षा जास्त जागा महायुतीला (Mahayuti) मिळणार आहेत. विधानसभेच्या निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. राज्यात लोकसभेनंतर केलेली कामे आणि विविध योजनांचा विधानसभेच्या निकालात फायदा झाल्याचं दिसत आहे. विरोधकांनी चुरस निर्माण केल्याचा प्रयत्न केला पण तसं झालं नाही”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
काही तासांतच राज्यात कोणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत महायुती आघाडीवर आहे. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.