पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरला. सबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कामगिरी उंचावलेली असताना पुण्यात मात्र काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर आता पुणे शहरात संघटनात्मक बदल करण्याची मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाला पुण्यात सक्षम करण्यासाठी तातडीने शहर नेतृत्त्वात बदल करावा. अरविंद शिंदे यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे.
पक्षातील वरिष्ठांनी शहराध्यक्षपदासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे, याबाबत विचारणा केली असता माजी नगरसेवक राहिलेल्या चंदू कदम यांचे नाव पुढे आले. चंदू कदम हे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच ते काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांचे चुलत भाऊ आहेत. विश्वजीत कदम यांनीच या शिष्टमंडळाला पक्षीश्रेष्ठींकडे शहराध्यक्ष बदलाची मागणी करण्यासाठी पाठवल्याचे बोलले जात असून चंदू कदम यांच्यासाठी विश्वजीत कदम फील्डिंग लावत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाची हानी होईल, असे वर्तन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. त्याचा फटका पक्षाला बसला आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले तरी, त्यांची भेटही शिंदे यांनी घेतली नव्हती. बूथ कमिट्यांमध्ये बोगस नोंदणी झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कसबा, कँटोन्मेंट, शिवाजीनगर या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर, आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी शहर नेतृत्त्वात बदल करण्याची गरज आहे.’ असे या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे,दत्ता बहिरट, चंदू कदम, अविनाश बागवे, जयंत किराड, साहिल केदारी, नुरद्दीन इनामदार, रमेश अय्यर, विजय खळदकर, विशाल मलके आदींच्या शिष्टमंडळाने चेन्निथला तसेच बाळासाहेब थोरात आदींची मुंबईत भेट घेतली.
महत्वाच्या बातम्या-
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’त महत्वाचे ५ बदल; जाणून घ्या नव्या जीआरप्रमाणे काय आहेत बदल?
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी
-श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश