पुणे : राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बारामती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पवार घराण्यातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उतरणार असल्याचं दिसत आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय कट्टर विरोधक शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार घराण्याविरुद्ध दंड थोपटले आहे. महायुतीमध्ये एकत्र असणाऱ्या अजित पवारांविरोधात विजय शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
बारामतीमधून निवडणूक लढवण्यासाठी विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बारामती निवडणुकीबाबत चर्चा केली. मात्र महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. या उमेदवारीची फक्त अधिकृत घोषणाच बाकी आहे. त्यामुळे आता विजय शिवतारेंनी आज माध्यमांसमोर आपली भूमिका व्यक्त केली आहे.
“आपण वेळ पडल्यास बारामतीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू”, असे विजय शिवतारे यांनी माध्यमांसमोर सांगताना आपला दुसरा पत्ता टाकला आहे. विजय शिवतारे यांच्या या वक्तव्याने राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचं बोललं जात आहे. विजय शिवतारे यांनी कोणत्याही परिस्थिती बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेचे नुकसान केले आहे. त्यामुळे मला पवार घराण्याविरोधातील मतं मिळतील. माझ्यावर शिवसेना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली तरी मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणारच”, असे विजय शिवतारे यांनी ठणकावून सांगितले आहे.
“मी शंभुराज देसाई यांना माझी भूमिका सांगितली आहे. ते माझं म्हणणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहेत. मी एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट सांगितली होती. पण ते म्हणाले की, ‘महायुतीत बारामतीची जागा अजित पवार गटाला सुटली आहे. पण सुनेत्रा पवार पराभूत होणार आहेत. त्यामुळे महायुतीचे नुकसान करण्याऐवजी ही जागा शिवसेनेला द्यावी’. मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारामती लोकसभेची निवडणूक जिंकून दाखवेन”, असा दावा विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर केला होता.
मात्र एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्याकडे बारामतीची जागा मागून घेऊ शकले नाहीत. ‘आपण युतीत आहोत. आपल्याला युतीधर्माचे पालन करावे लागणार आहे’, असं एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही शिवतारेंची अजित पवारांंविरोधातील आक्रमकता कायम आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना युतीधर्म, बारामतीची जागा आणि अजित पवारांबाबत समजून सांगूनही शिवतारे हे अजित पवारांवर टीका करत आहेत. त्यातच त्यांनी आज माध्यमांशी बोलताना वेळ आली तर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यावरुन आता विजय शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार गट आणि शिंदे गटातील तणावही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडून विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘रोहित, युगेंद्र पवारांवर दडपशाही होतेय, त्यांना सुरक्षा पुरवावी’; सुप्रिया सुळेंची मागणी
-धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’
-‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’; पंकजा मुंडेंचा विश्वास
-काँग्रेस अखेर ठरलं! आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर