पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. प्रचाराला सुरवात केली आहे. प्रत्येक उमेदवार आपापला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मात्र शिरुर मतदारसंघाचा प्रश्न अद्याप सुटलेला दिसत नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघाची लढत ही महायुतीने अधिक प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असणाऱ्या माजी मंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा,’ अशी सूचना केली आहे.
शिरुरच्या जागेवरुन महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपदेखील या जागेसाठी आग्रही आहेत. त्यातच शिरुरच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यापासून इच्छुक असलेल्या आढळरावांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. “महायुतीचे जागावाटप दोन दिवसांत होणार आहे. यात शिरूरची जागा कोणी लढायची, याचा निर्णय होईल. मात्र, तुम्ही निवडणूक लढण्याची तयारी करा. निवडणूक धनुष्यबाणाच्या किंवा घडाळ्याच्या चिन्हावर लढायची, याचा निर्णय दोन दिवसांत जागा वाटपात होईल”, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आढळरावांना केलेल्या या सूचनेवरुन शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर मतदारसंघासाठी आग्रही होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशाही चर्चा होत्या. पण राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांनी ‘आयात उमेदवार नको’ म्हणत आढळरावांच्या उमेदवारीला नकार दिला.
जागावाटपाबाबत महायुतीच्या चर्चांमधून शिरुरची जागा शिवसेनेकडे राहिल्यास आढळराव पाटलांना पक्ष बदलण्याची गरज नाही. येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. आता शिरुरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यास अजित पवार खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार आणि शिवसेनेकडे गेल्यास आढळराव पाटील हेच उमेदवार असणार हे मात्र निश्चित आहे. आता येत्या २ दिवसांत या जागेसाठी कोणाचं नाव वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान
-काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?
-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली
-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट
-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी