बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकारणाची चर्चा राज्यभर होत आहे. ‘बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती’ हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात रुजलेले समीकरण आहे. काका शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांनी भाजपची वाट धरल्यापासून पवार कुटुंबात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे.
बारामतीसाठी महायुतीच्या उमेदवाराचं नाव जरी जाहीर झालं नसलं, तरी राष्ट्रवादीनं लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेच्या रिंगणात आमने-सामने उभ्या ठाकणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र येणार आहेत.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे ‘तुकाराम बीज’साठी भाविक एकत्र येत असतात. या निमित्तानं खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आज बुधवारी सकाळी सव्वा ११ वाजता सुनेत्रा पवार तर ११ वाजता सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतील, असं त्यांच्या नियोजित दौऱ्यात वेळ ठेवण्यात आली आहे. याआधी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीतील जळोची मधील एका मंदिरात समोरासमोर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी एकमेकांनी मिठी मारली होती. आता डोर्लेवाडीमध्ये काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंनी जाहीर केली १७ उमेदवारांची यादी, कुणा-कुणाला संधी?
-पुणे लोकसभेत वसंत मोरेंचा वेगळा प्रयोग?? मराठा समाजाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात?
-मावळची जागा शिवसेनेला तर बारामतीची राष्ट्रवादीलाच मिळणार; अजित पवारांचे स्पष्ट संकेत
-“अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”; पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांची ग्वाही