पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकीय कट्टर विरोधक आहेत. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या वादाबाबत संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच आता अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्याने दोन्ही नेते महायुतीत आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. शिवतारे हे बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असून अजित पवार यांच्या तसेच महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात सभा, कार्यक्रम घेत अजित पवार तसेच पवार कुटुंबावर टीका करत आहेत.
‘विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. शिवतारे यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागावी. जोपर्यंत शिवतारे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही’, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये आहे. महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जायचे आहे. महाराष्ट्रातून महायुतीच्या ४५ जागा निवडून आणण्यासाठी काम करत आहोत. बारामतीमध्ये पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या विधानामुळे आम्ही नाराज आहोत. कार्यकर्ते संतप्त आहेत. आमच्या नेत्यांबाबत अतिशय चुकीची विधाने त्यांच्याकडून केली जात आहेत. त्यांच्या विधानामुळे महायुतीला तडा जात आहे”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले आहेत.
“राष्ट्रवादी काँग्रेसचा मावळच्या जागेवर दावा आहे. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली आणि शिवतारे यांची अशीच भूमिका राहिली. तर, मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाहीत. तोपर्यंत आम्ही मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत. राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही अशीच भूमिका घेतील. शिवतारे यांनी माफी मागितल्यास मावळमध्ये युतीचा धर्म पाळला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यांनी बारामतीत मोठी विकास कामे केली आहेत. त्यामुळे बारामतीत आमचा उमेदवार निवडून येईल, याची आम्हाला खात्री आहे, असेही अजित गव्हाणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय’; युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया
-‘आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का?’ सुप्रिया सुळेंकडून श्रीनिवास पवारांची पाठराखण
-निवडणुकीत ब्लॅक मनीचा वापर होऊ नये म्हणून इनकम टॅक्सकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना
-उमेदवारी डावलली अन् वरिष्ठांनी समजूत काढली, तरीही मुळीकांची नाराजी कायम; मतदारसंघातील बैठकीला दांडी