पुणे: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. न भूतो न भविष्यती असे यश मिळवत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला आहे. पुणे शहरात देखील आठ विधानसभा मतदारसंघापैकी सात जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला आपला गड असणारा कसबा मतदारसंघ गमवावा लागला होता. पोटनिवडणुकीत पराभव होऊनही झपाटून कामाला लागलेले हेमंत रासने यांनीच हा गड पुन्हा एकदा मिळवत भाजपचा झेंडा फडकवला आहे. रासने यांच्या विजय जल्लोषावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चक्क त्यांना खांद्यावर घेत आनंद साजरा केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कसब्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांची गेली अनेक वर्षापासून मैत्री आहे. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून दोघांनी राजकीय सुरुवात केली. पुणे महापालिकेत नगरसेवक तसेच मुरलीधर मोहोळ हे महापौर तर हेमंत रासने यांनी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून एकत्र कारकीर्द गाजवली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना कसबा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यात रासने यांचा सिंहाचा वाटा होता. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ यांनी कसब्यामध्ये रणनीती आखत रासने यांचा विजय सुकर केला. लोकसभा आणि विधानसभेच्या लढाईत दोन्ही मित्रांनी यश मिळवल आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर हेमंत रासने यांच्या विजयाचा जल्लोष ग्रामदेवता कसबा गणपती चौकामध्ये करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोहोळ यांनी आपल्या मंत्रीपदाचा कोणताही मोठेपणा मध्ये न आणता हेमंत रासने यांना थेट खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.
कसब्यात धंगेकर पॅटर्नचा फुगा फुटला, रासनेंनी मैदान मारलं.
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रास नाही यांनी तब्बल 19423 मतांनी विजय मिळवत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकी धंगेकर यांच्याकडून रासने यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरात झाली. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत रासने यांनी पोटनिवडणुकीचा वचपा काढत विजय मिळवला आहे.