पुणे : पुणे शहरातील ८ मतदारसंघापैकीच एक असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. याच कारण म्हणजे काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ल्याला लावलेला सुरुंग. कसबा पेठ विधानसभेचे सध्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत. कसबा पेठ मतदारसंघ हा शहराच्या मध्यवर्ती भागात असून या मतदारसंघात भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभेला कसब्यात १७ हजारांच्यावर मताधिक्य घेत भाजपने पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. रवींद्र धंगेकरांना कसब्यात रोखल्याने विधानसभेला आता नेमकं काय होणार? याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने धंगेकरांची डोकेदुखी वाढली आहे तर भाजपमध्येही अनेक चेहरे पुढे येत आहेत.
कसबा पेठ मतदारसंघाचा इतिहास काय?
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून रोहित टिळक, भाजपकडून गिरीष बापट आणि मनसेकडून रविंद्र धंगेकर यांच्यात लढत झाली. या निवडणुकीमध्ये गिरीष बापट यांनी ५४,२८२ मते घेत विजय मिळवला.
त्यानंतर २०१४ साली मोदी लाटेत गिरीष बापट यांनी ही जागा कायम राखली. आणि पुन्हा मनसेकडून रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसकडून लढलेल्या रोहित टिळक अशा दोघांना पराभूत केले. गिरीष बापट यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ७३,५९४ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.
२०१९ साली भाजपने गिरीष बाटप यांना उमेदवारी न देता मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. टिळक यांनी काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना पराभूत केले आणि ७५,४९२ मते मिळवत भाजपची कसब्याची जागा राखली. मात्र, २२ डिसेंबर २०२२ रोजी मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यामुळे कसबा पेठ विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली अन् यावेळी कसबा पेठ विधानसभेची चर्चा राज्यभर झाली. या पोटनिवडणुक काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली. यावेळी हेमंत रासने यांचा पराभव झाल्याने भाजपने आपला बालेकिल्ला गमावला.
कसब्यात महाविकास आघाडी अन् महायुतीच्या इच्छुकांची रस्सीखेच
आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसकडे असल्याने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे, रोहित टिळक यांची नावे सध्या चर्चेत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष देखील कसब्यासाठी आग्रही असल्याने काँग्रेसची अडचण वाढली आहे. माजी नगरसेवक विशाल धनवडे शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महायुतीकडून ही जागा भाजपकडे असल्याने कसब्यासाठी निवडणूक प्रमुख हेमंत रासने हे प्रबळ दावेदार आहेत. पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला तरीही रासने मतदारसंघात कामे करत राहिले. पक्षाने त्यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देत विश्वास दाखवला. गेली वर्षाभरापासून रासने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. भाजपमधून इच्छुकांची आणखी काही नावे समोर आली आहेत. शहराध्यक्ष धीरज घाटे, दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या सून स्वरदा बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. भाजपसाठी कसबा जिंकणे प्रतिष्ठेची लढाई झाल्याने नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कसबा मतदार संघातून अजय शिंदे, गणेश भोकरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरुन चंद्रकांत पाटलांचा सणसणीत टोला; म्हणाले, ‘त्यांच्या भाषणात…’
-पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्य पदाचा तिढा काही सुटेना!
-अजित पवारांविरोधात शरद पवारांची खेळी; ‘या’ तरुणांना मिळणार तुतारीकडून संधी
-पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
-Hadapsar: लोकसभेच्या विजयाने महाविकास आघाडीची गाडी जोरात, महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच