पुणे : विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची लगबग सुरू आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर त्यांना काँग्रेसने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळाल्याचा आनंद साजरा करत असतानाच धंगेकरांना धक्का देणारी बातमी पुढे आली आहे. लक्ष्मी रोडवर असणारी वफ्फ बोर्डाची १७ हजार ३०० फूट क्षेत्रफळ असलेली सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकत्याच दिलेल्या निकालात ही मालमत्ता ‘वक्फ’ बोर्डाची असल्याचे घोषित केल्यानंतर याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने तातडीने स्थगिती दिली आहे.
लक्ष्मी रस्त्यावर हामजेखान चौकात असलेला या १७ हजार चौरस फुटाच्या भूखंडाची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक आहे. या ठिकाणी होणारी उलाढाल ही करोडो रुपयांमध्ये असल्याने या भूखंडावर डोळा ठेवून तो लाटण्यात आल्याचा आरोप माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केला आहे. याप्रकरणी दावा दाखल करणारे रसुल अन्सर चित्तारी व त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
गणेश बीडकर म्हणाले, “डॉ. महमंद खान करीम खान यांनी ही मालमत्ता वक्फला देताना या मालमत्तेचा कशासाठी वापर करण्यात यावा, हे आपल्या वक्फनाम्यात स्पष्ट केले होते. या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न मशिदीसाठी, गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दफनविधी, गरिबांचे लग्नकार्य आदी समाजउपयोगी कार्यासाठी खर्च करावे, असा उदार विचार डॉ. महमंदखान करीमखान यांनी १९३६ साली वक्फनाम्यात मांडला होता. मात्र, त्यांच्या पश्चात ही जमीन वक्फ न होता तिचा गैरवापर सुरू होता. या प्रकरणी रसुल अन्सर चित्तारी व त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु यांनी वक्फ मंडळाकडे पाठपुरावा सुरू केल्यानंतर हा गैरप्रकार लक्षात आला आहे.
या जमिनीचा सध्याचा ताबा हा आमदार धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह सहकारी व्यक्तींकडे आहे. गेली अनेक वर्षे याप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षानंतर ७ ऑक्टोबर रोजी वक्फ मंडळाने हा भूखंड वक्फ असल्याचे घोषित केले. त्यामुळे मुस्लिम समाजाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी चित्तारी यांनी अनेक वर्ष न्यायालयीन लढा दिला. ही जागा वक्फ असल्याचे धंगेकर यांना माहिती असतानाही त्यांनी या जागेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू ठेवला होता. त्याला वक्फ मंडळाच्या आदेशाने लगाम लागला आहे. आमदार धंगेकर हे अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या पत्नीच्या नावे हा भूखंड असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत वक्फ असलेली मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी लाटून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले असल्याचा आरोप मूळ अर्जदार व सहकारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
महत्वाच्या बातम्या-
-हडपसरमध्ये बाबरांचं बंडाचं निशाण; म्हणाले, “ज्यांना आपलं देणं घेणं नाही, त्यांचं मलाही…”
-शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्या भिडणार