पुणे : विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून अनेक मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील उमेदवारींची यादी जाहीर झाली. पुण्यात काँग्रेसकडून कसबा मतदारसंघात विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर तर शरद पवार गटाकडून वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे आणि हडपसरमधून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहरात ठाकरेसेनेला केवळ एकच जागा मिळणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची लाट निर्माण होऊ लागली आहे. कसब्यातील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली उद्विग्नता मांडली आहे.
महाविकास आघाडीमध्ये वडगाव शेरी आणि हडपसरच्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आले. त्यामुळे हडपसरमधील स्थानिक नेते आणि माजी आमदार महादेव बाबर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. थेट बंडाचं निशाण फडकवत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर ठाकरे सेनेकडे असणाऱ्या कोथरुड मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे कोथरुडमध्ये आयात उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.
कधीकाळी पुणे शहरात शिवसेनेचे ३ आमदार होते. परंतु महाविकास आघाडीत केवळ एक जागा ठाकरेंच्या पदरी पडली आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक कमालीचे नाराज झाल्याचे चित्र असून आता याचाच फटका पुणे शहरात महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कसब्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पोस्ट करत “बाळासाहेब होते तेव्हा पुण्यात शशिकांत सुतार, दीपक पायगुडे, विनायक निम्हण, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे कित्येक आमदार होते. मुलांना उपाशी ठेऊन हसत रहा म्हणणे कितपत योग्य आहे? शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे. बाकी सगळे नंतर. प्रत्येक गोष्ट सहन करायची असेल तर मग शिवसैनिक आणि गुलाम यात काय फरक आहे, एकनिष्ठ होतो राहणार परंतु अन्याय सहन करणे हे गुलामीचे लक्षण आहे. उद्धव साहेब जो आदेश देणार तेच आम्ही करणार.” असं म्हंटलंं आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
कसब्यात बसणार शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका?
विशाल धनवडे यांच्यासह पल्लवी जावळे या कसबा मतदारसंघातून पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून विजयी झालेल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते. युवा नेते आदित्य ठाकरे यांची रॅली कसब्यात गेम चेंजर ठरली होती. परंतु आता होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत ठाकरे सेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याने धनवडे यांच्यासह जावळे या नाराज आहेत. याचा फटका काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक
-विधानसभा निवडणूक: मावळमध्ये १७ लाखांची रोकड जप्त; इतका पैसा येतोय कुठून?
-बालेवाडीत ‘सुरसंध्या’ कार्यक्रम यंदा जोरात गाजणार, ‘𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान’, अभंग Repost’चे आयोजन
-अमित शहा याला दारात तरी उभं करतील का?; भरणेंच्या प्रचारसभेतून अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा
-पुण्यात ५ कोटींची रोकड अन् आता सोन्याने भरलेला ट्रक; १३८ कोटींचं सोनं नेमकं कोणाच्या मालकीचं?