पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया उद्या बुधवारी पार पडणार आहे. मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असताना पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या पोस्टरमुळे कसब्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे पोस्टर झळकले आहेत. ‘कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, एक मराठा लाख मराठा’च्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो असणारे हे पोस्टर अनेक चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.
कसब्यात प्रमुख लढत असणारे काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार हे ओबीसी असून अपक्ष लढणाऱ्या कमल व्यवहारे या एकमेव मराठा समाजातील आहेत. त्यामुळे व्यवहारे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर्स लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना लागलेल्या या बॅनर्समुळे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असून उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. तत्पूर्वी काल संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सर्वच उमेदवारांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता कसबा मतदारसंघात एक मराठा लाख मराठाच्या घोषणेचा लागलेल्या बॅनर्समुळे राजकारण वातावरण तापताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवार उभे करणार नसल्याचे सांगितलं होतं. मात्र कोणत्या मतदारसंघात कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं हे समाजाने ठरवावे, असा सल्ला देखील दिला होता. त्यामुळे कसब्यात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लागलेल्या या बॅनरसाठी चर्चा संपूर्ण पुणे शहरात रंगली आहे.
विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा काँग्रेसकडून मैदानात असून भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढवत आहेत. तर मनसेचे गणेश भोकरे आणि काँग्रेस पक्षात उमेदवारी डावलल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या कमल व्यवहारे या चौघांमध्ये प्रमुख लढत पहायला मिळत आहे. काँग्रेस भाजप आणि मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार ओबीसी समाजातून येतात, कमल व्यवहारे या मराठा समाजातून असल्याने त्यांच्या समर्थनार्थच हे बॅनर लावण्यात आल्याची कुजबुज मतदारसंघात होऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
-महायुतीची एकजूट: हेमंत रासनेंना विजयापर्यंत नेणार; महायुतीचे कार्यकर्ते जोमात
-पुण्यात पैसे, सोन्याने भरलेला ट्रक त्यानंतर आता सापडलेल्या ट्रकमध्ये काय सापडलं?
-टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांना जाण्यापासून अडवलं; अजित पवार म्हणाले, ”काकी माझ्या…’