पुणे : पुणे शहरामध्ये बुधवारी चौकाचौकामध्ये दहिहंडी कार्यक्रम साजरी करण्यात आला. गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत आणि त्यावर थिरकणाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित ३५ सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहिहंडीचा थरार पुणेकरांना अनुभवयला मिळाला आहे.
ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहिहंडी संघाने ७ थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला. शहरातील चौक चौकात होणार्या दहिहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन संयुक्त दहिहंडी कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता.
३५ सार्वजनिक गणेश मंडळांनी या उपक्रमाला पाठिंबा देत या संयुक्त दहीहंडीत सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ऐतिहासिक लाल महाल चौकात या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या उत्साह पूर्ण वातावरणात २० गोविंदा पथकांनी सलामी देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यात मुंबईतील चेंबूर येथील तरुणी आणि महिलांच्या पथकाने दिलेली सलामी लक्षवेधक ठरली. रात्री साडेनऊच्या सुमारास कसबा पेठेतील शिवतेज दहीहंडी संघाने ७ थर लावत ही पहिली संयुक्त हंडी फोडली.
आयोजक पुनीत बालन व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेता प्रविण तरडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यासह राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संयुक्त दहीहंडीला हजेरी लावली होती.
-महत्वाच्या बातम्या-
-युतीचा धर्म फक्त भाजप शिवसेनेने पाळायचा का? मुळीकांनी आमदार टिंगरेंना सुनावलं
-वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळे एकवटली, ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून ३५ मंडळांची एकत्र दहीहंडी