पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी टीका करण्याची एकही संधी नेते सोडताना दिसत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
रूपाली चाकणकरांनी बोलताना इतिहास भूगोल जाणून घ्यावा, शरद पवार हे साठ वर्ष असेच राजकारण करत नाहीत, बारामतीच्या विकासात त्यांच्या मोठा वाटा असल्यानेच लोक त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी अजित पवार कोणामुळे नेते झाले याचा इतिहास वाचावा, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचे आव्हान देण्यात आल्याचा देखील आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.
“अजित पवार यांचा पूर्वीपासूनच धमकी देण्याचा स्वभाव आहे. आता ते उघड धमक्या देत असून पक्षात देखील आजपर्यंत त्यांनी तेच केलं. शरद पवारांच्या जवळील चांगली माणसं त्यांनी तोडली, वर्षानुवर्षे त्यांनी दादागिरीच केली. या जगात कोणाचे नशीब लिहिणारा जन्माला आलेला नाही, ज्या दिवशी एखाद्याला वाटतं की आपण दुसऱ्याच नशीब लिहितो, त्या दिवशी त्याचा काळ जवळ आला आहे असं समजायचं” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.