पुणे : पुण्यासह राज्यभरात गुंडगिरीचा हैदोस पहायला मिळतो आहे. एकीकडे राज्यात लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे तर, दुसरीकडे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिन्याभरापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्याचा तपास अजून सुरूच आहे. हे प्रकरण अजूनही नमलं नसतानाच पुण्यात आता गुन्हेगारांनी पुन्हा हैदोस घातला आहे. चक्क पोलिसांवरच हात उचलला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येरवडा कारागृहामध्ये एका अधिकाऱ्याला आंदेकर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून कारागृहातील सुरक्षारक्षक आणि अधिकारी देखील सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा चित्र पहायला मिळालं आहे. याप्रकरणी १० ते १२ जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारागृह अधिकारी शेरखान पठाण हे या घटनेमध्ये जखमी झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी १० ते १२ कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आलेली होती. त्यावरून ही धुसफूस सुरू होती. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर या १०-१२ कैद्यांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक
-पुणे पोलीस दलात बेशिस्तपणा; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय
-महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीकांनी घेतली भेट; शहरातील प्रश्नांसंदर्भात चर्चा
-नेता ते अभिनेता! अभिजीत बिचुकले लवकरच झळकणार चित्रपटात
-राग गेला, रुसवा हटला! राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?