पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत वडगाव शेरी मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाली तरीही या मतदारसंघातून भाजपने माजी आमदार जगदीश मुळीक यांना एबी फॉर्म दिला होता. पक्षाकडून मिळालेला एबी फॉर्म घेऊन जगदीश मुळीक अर्ज भरण्यासाठी येरवड्याच्या क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाले. मात्र उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणीस यांचा फोन आला अन् जगदीश मुळीक यांनी यु-टर्न घेतला.
“वरिष्ठांनी आदेश दिले भाजपात दिलेल्या आदेशांचं पालन केलं जातं. आम्हाला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचा आहे म्हणून मी अर्ज भरणार नाही” असं जगदीश मुळीक म्हणत मुळीकांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय मागे घेतला आहे. जगदीळ मुळीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असता तर मित्र पक्षांतील २ नेते आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले असते.
२०१९ मध्ये झालेल्या निवडणूक राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात सामना रंगला होता. मात्र, राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यामुळे दोन्ही नेते महायुतीमध्ये एकत्र पहायला मिळाले. मात्र आता या विधानसभा निवडणुकीत जगदीश मुळीक यांनी हा मतदारसंघ भाजपकडे घेण्याचा आग्रह धरला होता. आता जगदीश मुळीक यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जगदीश मुळीक तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या सोबत आहोत, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे. मात्र मुळीकांनी अर्ज भरणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता ज्या टिंगरेंनी त्यांचा पराभव केला त्यांचच प्रचार मुळीक करताना दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-काल अजितदादा रडले, अन् आज शरद पवारांनी केली नक्कल, रुमाल काढत पुसले डोळे
-शंकर जगतापांची राहुल कलाटेंवर टीका; ‘शरद पवारांचा कार्यकर्ता जरी असता तरी…’