पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. महायुतीला विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते पदाधिकारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष वाढीसाठी संघटनात्मक बांधणी आणि पक्षप्रवेशाचा सपाटा राजकीय पक्षांकडून लावला जात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी सध्या मोठी वेटींग लिस्ट आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पक्षप्रवेशाबाबत महायुतीतील तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांमध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षप्रवेशाबाबत काही गोष्टी तिन्ही पक्षांनी पाळण्याबाबत या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदेंकडून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचे बोलले जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे सेनेतील नेते आपल्याकडे वळणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. शिवसेनेप्रमाणेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पक्षप्रवेशासाठी होण्याची शक्यता आहे.
मुंबईत फडणवीस, शिंदे आणि पवारांच्या झालेल्या बैठकीत आगामी काळात पक्ष प्रवेश देताना महायुतीतील मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीतील पक्षांच्या नेत्यांचे प्रवेश हे इतर मित्रपक्षांमध्ये होणार नसल्याचं पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांचा पक्षात प्रवेश केल्यास येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती आणखी बळकट होईल. महायुती बळकट करण्यासाठी प्रवेश करुन घ्यायचे असतील तर विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांचे प्रवेश घडवून आणू अशी देखील चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?
-केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?
-पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी १ किलोचा ‘कमळ हार’ अर्पण
-पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरुन ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा!