पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे दीड दोन महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष, नेते जोमाने तयारीला लागले आहेत. भाजपने पुण्यातील बालेवाडी येथे कार्यकारिणी अधिवेशनात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यातच आरा भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे.
‘केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री असताना आणि महाराष्ट्रात सत्तेवर असताना शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काहीही केले नाहीच. उलट राज्याच्या विकासाला आणि सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचविण्याचीच भूमिका घेऊन महाराष्ट्राचे नुकसान केले. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असून त्यांनी गैरकारभाराला संस्थात्मक प्रतिष्ठा दिली. भाजपचे कार्यकर्ते आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभागात जागर करतील’, अशी घोषणा धीरज घाटे यांनी केली आहे.
‘शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात केलेल्या अपप्रचारातील प्रत्येक मुद्द्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या साक्षीने दिले जाईल. युपीए सरकारच्या काळात पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचा पंचनामाही केला जाईल. पवारांनी पुण्यातील कोणत्याही चौकात येऊन जाहीर चर्चा करावी, असे आव्हान अमित शाह यांनी दिले आहे. हिंमत असेल तर पवार यांनी या आव्हानास सामोरे जावे, अन्यथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सारा हिशेब उघड करतील व पक्षाचे कार्यकर्ते तो प्रत्येक प्रभागात पोहोचवतील’, असा इशाराही धीरज घाटे यांनी दिला आहे.
‘दूध भुकटी आयात, साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न शरद पवारांमुळेच टांगणीवर राहिला असून आरक्षणाच्या मुद्द्यावरील शरद पवारांची भूमिका संशयास्पद आहे, असा गंभीर आरोपही धीरज घाटे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तो’ कॉल मोरेंच्याच जवळील व्यक्तीने केला नाही ना? वसंत मोरे धमकी प्रकरणाला नवीन वळण
-पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी