पुणे : देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांच्या दोन्ही गटांमध्ये कलगितुरा रंगल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यातच आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मावळचे विद्यमान खासदार आणि आताचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीवे पार्थ पवार हे मावळ लोकसभेतून निवडणुकीला उभे राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी मावळची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरुन काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचले आहे. रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याची भाषा केली आहे.
“माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित दादा करत आहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजित दादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करतायेत. मात्र, पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय”, अशी प्रतिज्ञाच रोहित पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग
-हॉट फोटोशूट: प्राजक्ता माळीने शेअर केले दिलखेचक फोटोज; चाहत्यांनी पाडला लाईक्स, कमेंटचा पाऊस