बालेवाडी: आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देण्यास दुर्लक्ष करतो, मात्र आजचे दुर्लक्ष उद्याच्या गंभीर आजाराला निमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भाजपा नेते लहू बालवडकर यांच्या माध्यमातून २४ व २५ जानेवारीला अटलसेवा महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराच्या लोगोचे अनावरण आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
विविध सामाजिक उपक्रमातून बालवडकर यांचा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भर असतो. आज त्यांच्या वाढदिवासानिमित्ताने बालेवाडीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही उपस्थित राहून बालवडकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी २४ ते २५ जानेवारी रोजी होणाऱ्या अटल सेवा महाआरोग्य शिबीराच्या लोगोचे अनावरण मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या अटल सेवा महाआरोग्य शिबीरामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईतील नामांकित तसेच धर्मदाय, शासकीय आणि खाजगी रूग्णालयाचा सहभाग असणार आहे. या शिबिरात शस्र्क्रिया न करता व कुठलेही इम्प्लांट न वापरता गुडगा प्रत्यारोपण, सांधेदूखी, खुबा प्रत्यारोपण, अशा वेदनादायक आजारांवरती नवीन आयुर्वेदिक उपचार प्रणालीने उपचार केले जाणार आहेत.