पुणे : पुणे शहरामधील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणपती पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक येत असतात. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तसेच शहरातील नागरिकांसाठी पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधीच सुरु होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैच्या अखेरीस ते पूर्ण होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे महामेट्रोने नियोजन केले असल्याचे समजते. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असून, हा मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे. या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील मानाच्या ५ गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्याने गर्दी करतात. जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेटपर्यंत या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे. मध्यवर्ती भागात गर्दीमुळे भाविकांना वाहनाने जाणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी भाविक मेट्रोच्या सहाय्याने जाऊ शकणार आहेत.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम जुलैच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. या मार्गावरील सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम
-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा साधेपणा; सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार
-‘…म्हणजे विधानसभेसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत’; अजित पवार गटाची टीका