पुणे : पुणे शहरात गुइलेन बॅरी सिंड्रेम आजाराने थैमान घातले असून रुग्णसंख्या आता ६७ वर पोहचली आहे. या रुग्णांपैकी १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ रुग्णांवर आयसीयू (अतिदक्षता) मध्ये उपचार सुरु आहेत. महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला, किरकिटवाडी आणि धायरी, नांदोशी या गावांमधील नागरिकांमध्ये ‘जीबीएस’ आजार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून खराब पाण्याचा पुरवठा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ज्या विहिरीतून गावांना पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी केली.
महापालिकेने या गावांतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. ‘या पाण्यात काही मोजक्या तक्रारी वगळता बहुतांश ठिकाणी पाण्यामध्ये क्लोरिनची मात्रा पुरेशी (रेसिड्युअल क्लोरिन टेस्ट) आढळली, असे पर्वती जलकेंद्राच्या रसायनशास्त्रज्ञांच्या अहवालात म्हटले आहे. तसेच ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळलेल्या सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी, नांदोशी, बारंगणे मळा, धायरी, खडकवासला या गावांना शक्य तितक्या लवकर महापालिकेच्या जलशुद्धीकरणातून शुद्ध केलेले पाणी द्यायला हवे.’
‘या भागातील विहिरी आणि जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचा आदेश दिला आहे,’ असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. तसेच या विहीरीला संरक्षक जाळी तातडीने बसवून घेण्याच्या आणि पाण्याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.
पालिका आयुक्त डॉ. भोसले काय म्हणाले?
‘या गावातील विहिरी व जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. काही ठिकाणी जलवाहिन्यांशेजारी सांडपाणी साठत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे येथे साचलेले पाणी काढून टाकून आवश्यक तेथे नव्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाची ८५ पथके या परिसरात सर्वेक्षण करत आहेत. फक्त ‘फिल्टर’ केलेले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनी सध्या पाणी उकळून थंड करून प्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होईल’, असे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं
-पुण्यात ‘GBS’चं थैमान! २४ रुग्णांवर आयसीयूत उपचार, शहरात नेमकी रुग्णसंख्या किती?
-बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?