पुणे: विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यातील ठाकरे सेनेचे पाच माजी नगरसेवक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये या सर्वांचा प्रवेश भाजपमध्ये होणार असून पुण्यातील शेकडो कार्यकर्तेही यावेळी ठाकरे सेनेची साथ सोडणार असल्याचं बोलले जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रवेश पार पडतील.
महापालिका निवडणूकी संदर्भातील न्यायालयामध्ये दाखल असणाऱ्या प्रलंबित याचिकांवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.