पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषाला आपला जीव गमवावा लागला आहे. सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. १०-२० लाख डिपॉझिटची मागणी करत उपचार नाकारल्याने गर्भवती तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्वत: आमदार अमित गोरखे यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी होत आहे.
तनिषाचा मृत्यू झाल्यापासून रुग्णालयाबाहेर विविध संघटना आंदोलन करत निषेध व्यक्त करत आहेत. अशातच आज शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून चिल्लर फेकून निषेध नोंदविला गेला आहे. कालही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयाचे अधिकारी माध्यमांसमोर निवेदन देण्यासाठी आले असता त्यांच्या अंगावर आंदोलकांनी चिल्लर फेकली होती. पतितपावन संघटनेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला काळे फासून निषेध नोंदवला होता. त्यामुळे आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नावाचा फलक काढून टाकला आहे.
प्रशांत जगताप काय म्हणाले?
राज्य सरकारकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ट्रस्टने जमीन घेताना रुग्णांना अगदी माफक दरात उपचार केले जातील, असे सांगितले. पण ट्रस्टने राज्य सरकारचे नियम पाळले नाहीत. तर प्रत्येक रुग्णांकडून लाखो रुपये उकळले जातात, हे आजवर समोर आले आहे. आम्ही त्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोणत्याही प्रकाराची कारवाई झाली नाही. त्याच दरम्यान पुन्हा एकदा रुग्णांची पैशांची अडवणूक केल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये जबाबदार असणार्या डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जमीन राज्य सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी यावेळी प्रशांत जगताप यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलला उपरती, रुग्णांसाठी घेतला मोठा निर्णय
-‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया
-‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक