मुंबई | पुणे : राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आज देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून राजी होणार का याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.
“आम्ही सर्व आमदार त्यांना रात्री एकत्र भेटलो. आम्ही स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कॅबिनेटमध्ये आलं पाहिजे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे. त्यांनी सकारात्मक विचार करण्यास संमती दिली. ते मोदी आणि शहांचं खूप ऐकतात. तिथून संदेश आला तर एकनाथ शिंदे कधीच त्यांचा संदेश धुडकावणार नाहीत”, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असून फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु असताना शिंदे हे नाराज असल्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. तर या सर्व राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिंदे, अजित पवारांना टोला लगावला आहे.
“शिंदे हे आज १०० टक्के उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही. दिल्लीसमोर लढायची हिम्मत त्यांच्यात नाही. ती ताकद त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे. शिंदे यांचे युग संपले आहे. भाजपला केवळ त्यांची दोन वर्षांची गरज होती. भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष देखील फोडू शकतात. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे बहुमत आहे. असे असतांना देखील १० दिवस झाले तरी सरकार बनले नाही. त्यामुळे महायुतीत मोठी गडबड आहे. हे दिसून आले आहे. हे सर्वजण स्वार्थासाठी एकत्र आलेत. आणि उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्यासाठी आरक्षित केलं आहे”, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून प्रशांत जगतापांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरले १२ लाख ७४ हजार
-बाबा आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण; शरद पवारांनी घेतली भेट
-मुख्यमंत्रिपदाबाबतच्या ‘त्या’ चर्चेचा मुरलीधर मोहोळांनी केला खुलासा