पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील एका स्टंटबाजाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून या तरुणाने व्हिडीओ शूट केला आहे. दोन तरुणांना हा स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. या स्टंटबाज तरुणाला आता वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्टंटबाजीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने तरुणांचा शोध घेत त्यांना अटक केली. तसेच दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांची कारही जप्त केली आहे. प्रतीक सुशील शिंगटे (वय २४, कृष्णानगर, निगडी) आणि ओमकार कृष्णा मुंढे (वय २०, निगडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगेश सुरेश गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतीक शिंगटे हा चिकन आणि वडापाव सेंटर चालवितो. ओंकार मुंढे हा निगडी पोलीस लाईनमध्ये राहतो. हे दोघेही गुरुवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी साडे अकरा वाजता चिंचवड येथील केएसबी चौकामध्ये वेगाने कार चालवत स्टंटबाजी करत होते. शिंगटे हा कार चालवत होता. मुंढे हा कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करत होता. संपूर्ण रस्त्यावर वेगाने कार चालवत हे दोघेही स्टंटबाजी करत होते. त्यामुळे रस्त्यावरील इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
प्रतिक आणि ओंकार या दोघांच्या स्टंटबाजीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हीडीओ पोलिसांनी पाहिल्यानंतर तातडीने दोन्ही तरुणांना अटक केली. त्यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं’; काकांनी सांगितला ‘भावनिक’ शब्दाचा अर्थ
-स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात