पुणे: अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो पुणेकरांच्या साक्षीने गंगा आरती करत भक्तिपूर्ण वातावरणात याची सांगता करण्यात आली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणेन संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. एसपी कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या रामकथेला संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे आदी उपस्थित होते.
रामकथेच्या सांगता सत्रात बोलताना डॉ. कुमार विश्वास म्हणाले, “प्रभू श्रीराम मानवतेचे, माता सीता शांतीचे आणि वीर हनुमान ज्ञानाचे, शक्तीचे प्रतीक आहेत. प्रभूच्या चरणी समर्पित ज्ञानालाच शांततेचा शोध घेता येईल. ज्याच्यामध्ये शक्ती व विनम्रता आहे, तोच रामाच्या वंशाचा किंवा त्याचा शिष्य असू शकतो. राक्षसांचा वध प्रभू श्रीरामांना असाही करता आला असता, पण आयुष्याच्या वाटेवर संकटांचा, संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले राम देतात.”
आजच्या युगात चाललेल्या गोष्टींवर भाष्य करत डॉ. विश्वास म्हणाले, “रामायणामध्ये माता सीतेचे अपहरण झाले. कलियुगात भारतमातेच्या प्रतिष्ठेचे अपहरण, चोरी होताना आपण अनेकदा पाहतो. श्रीराम वनवासात जाताना राजमार्गाचा अवलंब करू शकले असते. मात्र, त्यांना राज्याच्या मर्यादा, संधी आणि भवतालच्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. राज्यातील सर्व प्रकारच्या प्रजेला जोडायचे होते. आजच्या काळी होणाऱ्या पदयात्रा आणि प्रभू रामांनी केलेली यात्रा यामध्ये खूप फरक आहे. देशाच्या प्रतिष्ठेवर अनेकदा घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी प्रत्येक देशवासीयाने आपल्या भारतमातेच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी योगदान द्यावे.”