पुणे : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथे पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नेत्यांमध्ये मंत्रिपदावरून नाराजी पाहायला मिळाली. पूर्वी मंत्री राहिलेल्या अनेक नेत्यांना यंदा मंत्रिपद नाकारल्यामुळे अनेक नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत. पुण्यामध्ये देखील भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अजित पवारांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. यावरुन आता अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“छगन भुजबळ यांना जितकी संधी आत्तापर्यंत मिळाली तितकी संधी महाराष्ट्रातील कुठल्याही ओबीसी नेत्याला मिळाली नाही.छगन भुजबळांना मोठं करण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आणि आता त्यांच्याच फोटोला चपला मारण्याचा प्रकार केला जात आहे. याचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काम आम्ही करु. महाराष्ट्रात भुजबळ एकटे ओबीसीचे नेते नाहीत. त्यांनी ओबीसीच्या नावावर दुकानदारी बंद करावी. अजित पवारांच्या फोटोला जोडो मारण्याला भुजबळांचा छुपा पाठिंबा आहे असं मला वाटतं, असा आरोप दीपक मानकर यांनी केला आहे.
“सगळीच पद तुम्हाला घरात हवी आहेत का? भुजबळ यांचे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने निदर्शन करत असतील तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, त्यांना जशास तसे उत्तर महाराष्ट्रभर दिले जाईल. पोस्टरला चपला मारण्याचे जे प्रकार होत आहेत, ते करू नका ही आमची वॉर्निंग आहे. असं जर पुन्हा कराल तर महाराष्ट्रात त्याचं उत्तर दिलं जाईल”, असं दीपक मानकर यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आंतरजातीय विवाह केला? घरच्यांचा विरोध; आता सरकारच देणार रहायला खोली
-पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई; आमदार लांडगेंनी सभागृहात वेधले लक्ष
-उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; बंद दाराआड नेमकं घडलं काय? चर्चेला उधाण
-पुणे पुस्तक महोत्सवाचा महाकुंभ! पुणेकरांसह देशभरातील वाचनप्रेमींना घातली भुरळ
-पुणेकरांनो सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडणार महागात; वाचा काय आहे शिक्षा?