पुणे : पुणे लोकसभा माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केल्याने संपूर्ण कर्वे रस्ता हा व्यापून गेला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना “पुणेकरांनीच ठरवल्याने मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी” असल्याचं विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की, “पुण्यात लोकांचे भाजप आणि महायुतीवर प्रेम आहे. महापौर म्हणून खूप चांगले काम केलेला उमेदवार आम्ही दिला आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे. दिवंगत गिरीशभाऊ बापट यांनी पुण्यात कार्यकर्त्यांचा अतिशय चांगला वारसा आम्हाला दिला आहे. त्यामुळे इथे मुरलीधर मोहोळ निवडून येतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही. मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुणेकरांमध्येच प्रचंड उत्साह आहे”.
दरम्यान, कोथरूड येथून निघालेल्या पदयात्रेचा चार तासांनी मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला. दरम्यान ठिकठिकाणी पदयात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. फुलांचा वर्षाव आणि भव्य पुष्पहाराच्या माध्यमातून स्वागत केले गेले.