विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून प्रत्येक जागेसाठी मोठा प्रचार केला जात असताना, कर्जत-जामखेडमधील भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले नव्हते. ते प्रचारासाठी फिरकलेही नाहीत. त्यामुळे निकालानंतर राम शिंदेंनी अजित पवारांवर टीका करत, त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. राम शिंदे हे आता विधान परिषदेचे सभापती झाले असून बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. ही सर्व राजकीय पार्श्वभूमी असतानाच येत्या १७ एप्रिल रोजी ‘शिव-फुले-आंबेडकर’ संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अजित पवार कर्जत-जामखेडमध्ये येणार आहेत.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात अजित पवार, राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. रोहित पवार आमदार असणाऱ्या मतदारसंघात हे दिग्गज नेते एकत्र येणार असल्याने कार्यक्रमाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
हा महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकाराने आयोजित केला गेला आहे. या तीन दिग्गजांना एकत्र आणून आपल्या राजकीय ताकदीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न सोनवणे यांनी केला आहे. निवडणुकीत आपण कर्जत जामखेड मध्ये सभा घेतली असती, तर निकाल वेगळा लागला असता, अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी थेट रोहित पवारांच्या पुढे केली होती. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अधिकच गाजण्याची शक्यता आहे.
या महोत्सवात कोण काय बोलणार, कोणाला टोले मारणार, याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक न राहता, राजकीय रंगही घेणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे संध्या सोनवणेंची ही खेळी नेमकी कोणावर भारी पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.