दत्त जयंती : दत्त जयंती ज्याला आपण दत्तात्रय जयंती असे देखील म्हणतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार मार्गशीष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मार्गशिर्ष महिन्यातील चंपाषष्ठीनंतर येणाऱ्या या दत्त जयंतीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर साक्षात ब्रह्मा, विष्णु महेश्वरांचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांचा जन्म झाला आहे. म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. येत्या १४ डिसेंबर रोजी शनिवारी दत्त जयंती आहे.
दत्त जयंतीचे महत्व-
दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांनी मिळून दत्तात्रय हा शब्द बनला आहे. दत्ताचा अर्थ आपण ब्रह्म, मुक्त आणि आत्मा आहोत, अशी अनुभूती ज्याला आहे असा तो म्हणजे दत्त…आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र तसेच विष्णूचा अवतार आहेत, असा बोध होतो. दत्त जयंतीला ७ दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह देखील असे म्हणतात. दत्त जयंतीला भगवान दत्ताची पूजा केल्याने ब्रह्मा, विष्णु, महेशाच्या उपासनेचे फळ आपल्याला मिळते. कारण भगवान दत्ताला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते.
दत्त जयंती दिवशी पूजा कशी करावी?
धार्मिक मान्यतेनुसार दत्त जयंतीच्या दिवशी श्री दत्तात्रेयासह लक्ष्मी-नारायणाची देखील पूजा केली जाते. या पूजेमुळे धनसंपत्तीत वाढ होते. दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते.
दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा.
आपले देवघर स्वच्छ करुन त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा.
दत्ताच्या मुर्तीचा गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा. फुले वाहावीत. धूपदिप, अगरबत्ती लावावी.
देवाला नैवेद्य अर्पण करुन गुरुचरित्राचे पारायण किंवा दत्ताच्या मंत्राचा जप करावा. श्री दत्ताची आरती म्हणावी. गोड प्रसाद करुन आरतीनंतर सर्वांना द्यावा.
दत्त जयंतीचा अमृत काळ?
मार्गशिर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या तिथीला दत्त जयंती असते. शनिवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ५९ मिनिटांनी पौर्णिमा सुरु होणार असून रविवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ३१ मिनिटांनी संपणार आहे. उदय तिथीनुसार अमृतकाळ सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनंतर सुरु होणार आहे. त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी अमृतकाळात आपण दत्ताची पूजा आरधना करु शकतो.