पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का देत विजय मिळवणारे रवींद्र धंगेकर म्हणजे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असणारा चेहरा. पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या जोशात त्यांनी लोकसभा लढवली, मात्र विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी त्यांना धोबीपछाड दिला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पोटनिवडणुकीतील वचपा काढत हेमंत रासने यांनी धंगेकरांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. विविध मुद्द्यांवरून सरकारवर टोकाची टीका करणारे धंगेकर स्वतःला काँग्रेसचे हिरो म्हणून घेत. लागोपाठ झालेल्या दोन पराभवानंतर आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
रवींद्र धंगेकर हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला सोडचिट्टी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आज ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धंगेकर यांच्या राजकारणाची सुरुवात मूळ शिवसेनेतून झाली होती. पुढे त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेमध्ये प्रवेश केला. २०१७ साली महापालिका निवडणूक अपक्ष लढवत विजय मिळवला. पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, “लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांचं काम करू शकत नाही. मागच्या काही दिवसांत मी दोन-तीन वेळा एकनाथ शिंदे यांची कामानिमित्त भेट घेतली होती, उदय सामंत यांचीही भेट झाली. एकदा तुम्ही आमच्या सोबत काम करा, असं ते मला वारंवार सांगत होते. कामं तर करायची आहे, पण सत्तेशिवाय कामं होत नाहीत. अखेर सर्वांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला” असं रवींद्र धंगेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.