पुणे: गेली तीन वर्षांपासून महापालिका निवडणूक न झाल्याने नागरिकांसह लोकप्रतिनिधी हैराण झाले आहेत. माजी नगरसेवकांकडून विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातायत, यामध्ये विरोधी पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांकडून खोडा घालण्याचा प्रकार सर्रास होत असल्याने अनेकदा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळत. आज पुणे महापालिकेत विकास कामांमध्ये अडथळा आणत असल्याच्या कारणावरून भाजपच्या एका माजी नगरसेविकेने काँग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्याला चक्क चपलेने चोप दिला. हा प्रकार पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
झालं असं, की पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर परिसरामध्ये आदिवासी मुलींसाठी वसतिगृह बांधले जात आहे. वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत भागाच्या कामासाठी गरजेची असणारी दोन कोटींची वर्क ऑर्डर प्रलंबित असल्याने कामाला विलंब होत आहे. हे काम लवकर मार्गी लावण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविकेकडून पाठपुरावा केला जात आहे. परंतु शहर काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या कार्यकर्त्याकडून माहिती अधिकार कायद्याचा वापर करत कामामध्ये आडकाठी आणली जात असल्याच संबंधित नगरसेविकेच म्हणण आहे.
आदिवासी वस्तीगृहाच्या प्रलंबित कामा संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी संबंधित माजी नगरसेविका आज पालिका अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. याचवेळी काँग्रेस नेत्याचे जवळचे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करणारा कार्यकर्ता तिथे आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या कार्यकर्त्यांच्या बोलण्याने संतापलेल्या नगरसेविकेने थेट पायातील चप्पल काढत चोप दिला. हा वाद एवढा वाढला की महापालिकेच्या भवन विभागामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. त्यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष महापालिका परिसरात उपस्थित होते. त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत. यामध्ये मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.