पुणे: महाराष्ट्रामध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागा वाटप जाहीर करतानाच आमच्यामध्ये एक वाक्यता असल्याचं सांगितलं. परंतु अद्यापही काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांचा प्रचार करत नसल्याने नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार थांबवण्याच्या सूचना शिवसैनिकांना केल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे महाविकास आघाडी सर्वकाही आलबेल नसल्याचं पुढे आलं आहे.
सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात सुप्त संघर्ष सुरू आहे. दोन्हीकडील नेत्यांनी यावरून जाहीररीत्या एकमेकांवर टीका देखील केली. ही सर्व परिस्थिती निवडणुकीत पुढे येत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाचे उमेदवाराच्या प्रचार केला जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार थांबवण्याची सूचना केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. न्युज १८ लोकमतने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये अनुक्रमे मावळमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे. आघाडीच्या सूत्रानुसार सर्वांनी मिळून प्रचार करणे गरजेच आहे. परंतु महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये कोल्डवॉर सुरू असल्याने पुण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना फटका बसू शकतो.