पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा वाद विकोपाला पोहचला होता. गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. तर भाजपमधूनच अनेकांनी जगताप कुटुंबात उमेदवारी देण्याला विरोध केला. मात्र, आता चिंचवडच्या भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
महायुतीच्या फॉर्म्युल्यावरुन विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळणार. तसेच लक्ष्मण जगताप यांचा पत्नी म्हणून मीच वारसा चालणार असल्याचं सांगत अश्विनी जगताप उमेदवारीची मागणी करत होत्या. त्यातच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारीसाठी हालचाली केल्याचे पहायला मिळाले. अश्विनी आणि शंकर या दीर-भावजईच्या वादात पक्षातीलच अनेकांकडून जगताप कुटुंबाला विरोध करण्यात आला. त्यानंतर आता अश्विनी जगताप यांनी माघार घेत दीराला (शंकर जगताप) उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
”माझ्याऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी देण्यात द्यावी,” अशी मागणी अश्विनी जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. अश्विनी जगताप यांच्या माघारीमुळे शंकर जगताप यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज अश्विनी जगताप यांनी पुण्यात चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.
दरम्यान, भाजपकडून शंकर जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित असताना भाजपमधीलच शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. चिंचवड मतदारसंघात जागोजागी पोस्टर्स झळकताना दिसत आहेत. मात्र जगताप कुटुंबात उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपचा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात राजकारण पेटलं! ‘आमच्यात फूट पाडणाऱ्यांचा…’ सुनील शेळकेंनी दिला इशारा
-अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर; म्हणाले, ‘एकी ठेऊन आता विधानसभेला…’
-जगदीश मुळीकांनी घेतली बानकुळेंची भेट; वडगाव शेरी भाजपकडे घेण्याबाबत चर्चा?
-कसब्याचा फैसला बावनकुळेंनी एका शब्दात संपवला; ‘उमेदवार जातीवर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर…’
-अजितदादांच्या राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरूच; आधी ६०० अन् आता किती पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे?