पुणे: विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यात शिल्लक असल्याने संपूर्ण राज्यामध्ये इच्छुक तसेच विद्यमान आमदार कामाला लागले आहेत. पुणे शहरातील आठही मतदार संघात सध्या इच्छुकांचे पीक जोमात असल्याचा पाहायला मिळत आहे. भाजपचे पहिल्या फळीतील नेते असणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात देखील भाजपमधूनच इच्छुक पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचा धडका लावत रान उठवले आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील यांनी मास्टरस्ट्रोक लावत आपल्या खंद्या समर्थकावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. अशातच अमोल बालवडकर यांनी बंडाची भूमिका घेतल्याने भाजपकडूनही आता कार्यकर्त्यांना ताकद देण्यात येत आहे. याठिकाणी गणेश कळमकर, राहुल कोकाटे, लहु बालवडकर, प्रल्हाद सायकर, ज्योती कळमकर, सायली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर हे चंद्रकांत पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. यातच आता पुणे शहराचे चिटणीस लहू बालवडकर यांच्याकडे भाजपने आता ‘कोथरूड उत्तर मंडळ संयोजक’ पदाची जबाबदारी सोपविली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यासंदर्भात एक पत्र काढून त्यांची नियुक्ती केली आहे.
पुण्यातील झपाट्याने विकसित झालेल्या बालेवाडी-बाणेर, सुस- म्हाळुंगे, औंध भागामध्ये लहू बालवडकर भाजपचे एकनिष्ठ म्हणून काम करीत आहेत. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यानही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अधिकचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम केलं आहे. यातच आता अमोल बालवडकर यांना शह देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर यांना बळ देल्याच दिसत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये कोथरूड मतदार संघात आपली पकड मजबूत केल्याचं दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनाच भाजपकडून उमेदवारी दिली जाणार हे निश्चित आहे. कोथरूड मधून इच्छुक असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा तर मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार होत थेट केंद्रात राज्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे पाटील यांच्या पुढे इच्छुकांचे आव्हान नसणार असे मानले जात होते, मात्र अमोल बालवडकर यांनी अप्रत्यक्षपणे बंड केल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता भाजपने लहू बालवडकर यांची नियुक्ती करून शह देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात शहरात कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.