पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे ११ दिवस उरले असून उमेदवारांना प्रचार करण्यासाठी नऊ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवाराकडून सभा, पदयात्रांसह नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर देखील जोर देण्यात आलाय. कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या भेटीगाठींचा धडाका सुरू आहे. पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर नागरिकांकडून देखील पसंतीची मोहर उमटल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे.
नवचैतन्य हास्य योग परिवाराचे सदस्य चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड खूश असून, चंद्रकांतदादांसारखा लोकप्रतिनिधी कधीही पाहिला नाही, अशी भावना नवचैतन्य हास्य योग परिवाराचे कार्याध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केली. नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या वतीने कोथरूड विभागाचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
मकरंद टिल्लू म्हणाले की, माणसांना सृजनशील बनविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले. दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिलंय. असा राजकारणी सामाजिक जीवनात पाहणं मोठं कठीण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात नकारात्मक माणसांऐवजी सकारात्मक माणसांना साथ दिली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी विठ्ठल काटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दादांच्या कामाचे कौतुक करुन आशीर्वाद दिले
.